‘शिंदे गटात गेल्याचा दावा खोटा, मी ठाकरेंसोबतच’
या राज्यातील प्रमुखांनी केली शिंदे गटाच्या दाव्याची पोलखोल
मुंबई दि १७ (प्रतिनिधी)- शिवसेनेतील बंडाळीनंतर बारा राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र गोव्याचे शिवसेनाप्रमुख जितेश कामत यांनी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलोही नाही, असं सांगत शिंदे गटात प्रवेशाचा दावा फेटाळून लावला, आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं ठामपणे सांगितले आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये १२ राज्यांच्या शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचा दावा केला जात होता. मात्र मी एकनाथ शिंदेंना भेटायलाही गेलो नव्हतो. जे कोण भेटले, त्याविषयी मला माहिती नाही. माझं नाव त्यात घेऊ नये, कारण त्या व्हायरल फोटोत तर मी कुठे दिसतही नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पद दिलं, मी त्यांच्यासोबतच आहे, असं जितेश कामत यांनी स्पष्ट केले आहे. सुरूवातीला आठ प्रमुखांचा पाठिंबा नंतर १२ प्रमुखांपर्यंत पोहोचला होता. पण आता गोव्यातील प्रमुखांनी त्याचा इन्कार केला आहे. शिवसेनडकडूनही शिंदे गटात गेलेले संबंधित नेते अधिकृत नसून, अधिकृत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट देत आपल्यासोबत असल्याचं सांगितल्याचा खुलासाही ठाकरेंतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाला नेमका किती राज्य प्रमुखांनी पाठिंबा दिला या बाबत संशय निर्माण झाला आहे.
दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, मणिपूर, छत्तीसगड या राज्यांच्या शिवसेना प्रमुखांनी शिंदे गटाला समर्थन दिल्याचा दावा केला जात होता. पण आता समर्थन उद्धव ठाकरेंनाच असल्याचे सांगितले जात आहे.आगामी काळात खरी शिवसेना कोणाची हे ठरवताना राज्याबाहेरील पदाधिकाऱ्यांचं मतही ग्राह्य धरलं जाणार असल्याचा उल्लेख असल्यामुळे शिंदे गट त्यासाठी प्रयत्न करत आहेत.