
सांगली काँग्रेसच्या वतीनं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी देखील हजेरी लावली होती.यावरून आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी यावरून आता थेट काँग्रेसला इशारा दिला आहे.
‘लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्या दिवसापासून काँग्रेसकडून गद्दारी झाली आणि त्या गद्दारीचाच अधिकृत पुरावा म्हणजेच काँग्रेसचे स्नेहभोजन असल्याची’ टीका शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील 70 टक्के विशाल पाटील यांचे आणि 30 टक्के काम भाजपाचे केल्याचा’ आरोप विभूते यांनी केला आहे. ‘गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार असून काँग्रेसने तात्काळ शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी,अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही,’ असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघ यावेळच्या निवडणुकीमध्ये चांगलाच चर्चेत आला. सांगलीमधून काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छूक होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून इथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यानं त्याचा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसू शकतो अशी चर्चा आहे. सांगलीमध्ये यावेळी तिरंगी लढत झाली.