काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्यांची होणार निवड?
काँग्रेस नाना पटोलेंना देणार नारळ, या तारखेला होणार नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड?
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी सुमार राहिली. महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागा लढूनही काँग्रेसला अवघ्या १६ जागांवर समाधान मानवे लागले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर पक्षात भाकरी फिरणार अशी शक्यत वर्तवली जात आहे. त्यामुळे काठावर निवडून आलेले नाना पटोले यांना नारळ भेटण्याची शक्यता आहे.
पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरबारी राजकारणाला बगल देत तरुण नेत्यांकडे पक्षाची जबाबदारी देण्याचा विचार हायकमांड करत आहे. सतेज पाटील, अमित देशमुख आणि विश्वजीत कदम यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाण्याची जास्त शक्यता आहे. पण त्याचबरोबर विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांची देखील नावे चर्चेत आहेत. प्रभा राव नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावर कोणत्याही महिला नेत्याची निवड झालेली नाही. मात्र विधानसभा निवडणूकीतील पराभव त्यांच्यासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. तर विधानसभा निवडणुकीत झालेली पिछेहाट आणि अशात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने अनुभवी आणि आक्रमक नेता म्हणून विजय वडेट्टीवार यांचा देखील विचार होण्याची शक्यता आहे.
नाना पटोले यांना मातृशोक झाला असल्याने ते भंडारा जिल्ह्यातील आपल्या गावी सुकळी येथे आहेत. येत्या ११ तारखेला शनिवारी त्यांच्या गावच्या घरी तेरावी आणि गंगापुजनचा कार्यक्रम आहे. त्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड होईल, अशी शक्यता आहे.