Latest Marathi News
Ganesh J GIF

खंडणीखोर बोगस पत्रकारांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, पाटस टोलनाक्यावर गोळीबारचा थरार

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुणे येथील एका व्यावसायिकाला पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सोलापूर येथील बोगस पत्रकार व त्याच्या साथीदारावर पाटस येथे पोलिसांवर गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

महेश सौदागर हनमे, दिनेश सौदागर हनमे, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पुण्यातील खराडी परिसरातील एका व्यवसायिकाकडे ५ कोटींची खंडणी मागितली होती. मात्र तडजोडीअंती ५० लाखांची खंडणी देण्याचे ठरले. पण व्यावसायिकाने हा प्रकार पोलीसांना सांगितला. पुणे येथील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये महेश हनमे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान त्या व्यावसायिकाला बोगस पत्रकारांनी खंडणीची रक्कम घेऊन पाटस टोलनाक्यावर येण्यास सांगितले. पण खंडणीची मागणी केलेल्या व्यावसायिकासोबत पोलीस असल्याची माहिती समजताच बोगस पत्रकारांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाडीघालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी पिस्तूलातून दोन राऊंड गाडीच्या पाठीमागील चाकावर फायर केले. त्यानंतर मदतीसाठी आलेले पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने दोघा खंडणीखोरांना पकडले. दरम्यान या थरारक प्रसंगात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. दरम्यान हनमे यांनी याआधीही संबंधित व्यावसायिकाची बदनामी करण्याच्या उद्देशाने वगेवगळया खोटया बातम्या तयार करून त्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवर विविध लोकांना पाठवून पोलिस केस करण्याची धमकी दिली होती. तसेच आतापर्यंत व्यावसायिकाने त्यांना ३ लाख ८० हजार रूपये दिलेले आहेत. याप्रकरणी, पाटस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन आरोपींचे सरकारी कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे पुढील तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!