
सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातील ‘या’ अभिनेत्रीला कोर्टाचा दिलासा
अमली पदार्थ प्रकरणामुळे टाकलेली ती अट केली रद्द, विरोधी बाजूला वकिलाचा तो दावा अमान्य, नेमके काय घडले?
मुंबई – अमली पदार्थांच्या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रिया चक्रवर्ती हिला विदेशात जाण्याची परवानगी कोर्टाकडून मिळाली आहे. मुंबई हायकोर्टाकडून रिया चक्रवर्तीच्या जामिनाच्या अटी कमी करण्यात आल्या आहेत.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया आणि तिचा भाऊ अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवायचे, असा आरोप आहे. या प्रकरणात तिला 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. जामीन मंजूर करताना ट्रायल कोर्टाने रिया चक्रवर्तीला विशेष न्यायाधीशांच्या पूर्व परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये अशी अट घातली होती. त्यामुळे रियाला विदेश प्रवासासाठी दर वेळी आपला पासपोर्ट एनसीबीकडे सादर करावा लागला आणि कनिष्ठ न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत होती. त्यामुळे न्यायालयात रिया चक्रवर्ती हिच्या वकिलाने जोरदार युक्तीवाद केला. ते म्हणाले की, “तिला कामासाठी परदेशात जावे लागते आणि पूर्व परवानगी मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांना काम सोडून द्यावे लागले. त्यामुळे आर्थिक चणचणही भासली.” तसेच या प्रकरणात आठ सह-आरोपींनाही सवलत देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. विरोधी वकिलांनी आक्षेप घेतला की, रिया चक्रवर्ती हिला विशेष वागणूक देऊ नये. कारण ती एक सेलिब्रिटी आहे. ती देशात परत येऊ शकत नाही. पळून जाण्याचा धोका आहे. यावर उच्च न्यायालयाने म्हटले की, “रिया चक्रवर्ती यांनी आजपर्यंत खटल्यात सहकार्य केले आहे आणि त्यांच्यावर लादलेल्या कोणत्याही जामीन अटींचे उल्लंघन केल्याचे आढळलेले नाही. जेव्हा ती ट्रायल कोर्टाच्या परवानगीने प्रवास करते तेव्हा ती पुन्हा देशात येते. त्यामुळे अट शिथिल करत रियला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयने तब्बल चार वर्षांनी प्रकरण बंद करण्याबाबत अहवाल दाखल केला होता. या अहवालानुसार रियाने दाखल केलेल्या तक्रारीत सीबीआयला काहीही संशयास्पद आढळले नाही आणि त्यामुळे तपास बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. सुशांत याचा मृतदेह १४ जून २०२० रोजी त्याच्या निवासस्थानी आढळून आला होता. त्यामुळे रियाला अटक करण्यात आली होती.
रिया चक्रवर्ती ही एक अभिनेत्री आहे, जिने MTV वर व्हीजे म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि २०१२ मध्ये ‘तुनेगा तुनेगा’ या तेलगू चित्रपटातून अभिनय पदार्पण केले. तिने ‘मेरे डॅड की मारुती’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘जलेबी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१३ मध्ये ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता.