धाराशिव नाही उस्मानाबाद हेच नाव वापरण्याचे न्यायालयाचे आदेश
राज्य सरकारच्या मागणीनंतर उच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश, न्यायालयात काय घडल?
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- नामांतराविषयी मोठी बातमी समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नामांतर फक्त शहराचे झाले असून तालुका आणि जिल्हा नाव मात्र उस्मानाबादच असणार आहे. १० जूनपर्यत हा निर्णय असणार आहे.
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या राज्याच्या प्रस्तावास काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिली. गृहमंत्रालयाने अधिकृत परिपत्रक जारी करत मान्यता दिली. आहे पण महसूल विभाग स्तरावर बदल होईपर्यंत उस्मानाबादचं नाव बदलणार नाही, अशी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे. त्यामुळे धाराशिव हे जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव शासकीय व इतर कामकाजासाठी वापरू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. पुढील सुनावणी ६ जून रोजी होणार असून १० जूनपर्यंत उस्मानाबाद हे नाव वापरा असं कोर्टाने म्हटलं आहे. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याचे व उस्मानाबाद तालुका नाव बदलन्याची प्रक्रिया सध्या सुरु असून आक्षेपावर सुनावणी सुरु आहे. केवळ उस्मानाबाद शहराचे नाव हे धाराशिव केलं आहे. त्यामुळे शहरासाठी धाराशिव हे नाव वापरता येणार आहे. जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव हे धाराशिव वापरू नये, ते उस्मानाबाद असं वापरावे असं कोर्टाने नमूद केलं आहे. याचिकाकर्ते याचे वकील ऍड प्रज्ञा सतीश तळेकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामांतराला विरोध करणाऱ्यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडूनही फटकारलं होते. नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने मागील महिन्यात फेटाळली होती. यामुळे नामांतरविरोधी संघटनांसाठी ही मोठी चपराक समजली जात होती.
उस्मानाबादचे नाव धारासूर या राक्षसाच्या नावावरुन धाराशीव करण्याच्या विरोधात दोन नवीन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. केवळ धर्मांध लोकांच्या मागणीवरून उस्मानाबादचे नाव धारासूर राक्षसाच्या नावावर धाराशीव असे बेकायदेशीररित्या करण्यात येत आहे, असा आरोप करण्यात आला होता.