राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमधून तिचा खून झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दर्शना पवारच्या डोक्यात आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
घटना नेमकी काय?
MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार हिचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. ती आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले आणि त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अचानक राजगडाच्या पायथ्याची या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना पवार असं या तरुणीचं नाव असून राहुल हांडोरे, असं तिच्यासोबत ट्रेकिंगला गेलेल्या मित्राचं नाव आहे. हा मित्र सध्या फरार आहे. याच मित्राने हत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. CCTV फुटेजपाहून हा संशय वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहेत. त्यानुसार दर्शना आणि राहुल यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात येणार आहे.
घटना क्रम
दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला राजगडावर दुचाकीने गेले होते. साधारण 6 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहोचले. त्यानंतर दोघांही गड चढायला सुरुवात केली. मात्र नंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्हीतून ही माहिती समोर आली आहे. राहुल सध्या बेपत्ता आहे. राहुल नेमका कुठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या मोबाईलचं लोकेशन बाहेरील राज्यात दिसत आहे. मात्र दुसऱ्यांच्या फोनवरुन त्याने घरच्यांना फोन करुन काही माहिती दिली आहे. या प्रकरणात मी काहीही केलं नसल्याचं घरच्यांना सांगितलं आहे.
12 जूनपासून दर्शना पवार होती बेपत्ता
राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दर्शना पवार हिचे वडील दत्तात्रय पवार यांनी 12 जूनलाच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यामुळे पोलिसांनी दत्तात्रय पवार यांना माहिती देत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतलं. त्यांनी राजगडाच्या पायथ्याशी मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरुन दर्शनाच असल्याचं सांगितलं. दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता आणि काही भाग प्राण्यांनी खाल्लेला देखील होता, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे