खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने डेक्कन येथील झेड ब्रीजखाली असलेल्या स्टॉलमध्ये पाणी शिरले. तेथील अंडा भुर्जी स्टॉल हलविताना वीजेचा धक्का बसल्याने तीन तरुण कामगारांचा मृत्यु झाला. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिषेक अजय घाणेकर (वय २५, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (वय २१, रा. पूलाची वाडी डेक्कन), शिवा जिदबहादुर परिहार (वय १८, नेपाळी कामगार) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.भिडे पुल ,
पुण्यात गेल्या दहा वर्षातील विक्रमी पाऊस बुधवारी दिवसभर पडत होता. त्यामुळे खडकवासला धरण पूर्ण भरले. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भिडे पुल बुधवारी सायंकाळी पाण्याखाली गेला. रात्री उशिरा भिडे पुलाखालील चौपाटीमध्ये पाणी शिरले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या चौपाटीतील अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न तेथे काम करणारे तीन कामगार करत होते.त्यावेळी त्यांना वीजेचा धक्का बसला. त्यांना तातडीने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.डॉक्टरांनी त्यांना मृत्यु पावल्याचे घोषित केले. डेक्कन जिमखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.