
उपमुख्यमंत्रीजी माझा ७ कोटींचा निधी गेला कुठे?
भाजपा महिला आमदाराने उपमुख्यमंत्र्यांना जाहीर कार्यक्रमात विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल
भोपाळ – सिधी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार रीती पाठक यांनी जाहीर कार्यक्रमात आपल्याच उपमुख्यमंत्र्यांची कोंडी केली आहे. त्यामुळे विरोधकांनाही आयते कोलीत मिळाले आहे.
मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ला एका खासगी रुग्णालयात उद्घाटनासाठी आले होते. त्या कार्यक्रमाला आमदार पाठक देखील उपस्थित होते. कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ला हे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत चर्चा करत असताना तेथे उपस्थित असलेल्या सीधीच्या आमदार रीती पाठक यांनी जिल्ह्याच्या व्यवस्थेसाठी देण्यात आलेले सात कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल उपस्थित केला. तसेच मी सहा-सात वेळा तुम्हाला पत्र लिहिले. पण एकाही पत्राचे उत्तर मिळाले नाही. तुम्ही विंध्यचे विकास पुरुष आहात. रीवा जिल्हाच्या बाहेरही हा विकास यावा. त्यामुळे आरोग्य मंत्री म्हणून मी तुमच्यावरच गायब झालेले सात कोटी रुपये शोधण्याची जबाबदारी टाकते, असा टोलाही आमदार पाठक यांनी लगावला आहे. आमदारांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
https://x.com/jitupatwari/status/1881229992069419311?t=ZRHd7mszF43QR87-Gyd8OA&s=08
विरोधकांनी यावर टिका केली आहे. काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी निशाना साधताना हे सरकार आमदाराचेच ऐकत नाही, तर मग सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल? उपमुख्यमंत्र्यांसारखे असे किती नेते आहे, जे केवळ आपल्य जिल्ह्यापुरतेच मर्यादित झाले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.