
देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंना जोरदार दणका
फडणवीस-शिंदेंमध्ये शीतयुद्ध?, दिल्लीत शिंदेंनी तक्रार केल्यानंतर फडणवीस यांनी दाखवली ताकत?, नेमके काय घडले?
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी नियुक्तीसाठी दोघांनीही एकाच दिवशी वेगवेगळे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे महायुतीमधील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.
एकाच दिवशी दोन सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन सरकारमध्येच गोंधळ सुरू असल्याचे बुधवारी समोर आले. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून आशिष शर्मा यांची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने अश्विनी जोशी यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बेस्ट कर्मचारी संपावर गेल्यास मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडण्याच्या धास्तीने नगरविकास विभागाने बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे देण्याचे आदेश मंगळवारी काढला.. त्यानुसार जोशी यांनी महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार तत्काळ स्वीकारुन आंदोलकांशी चर्चा करुन संप होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना मंत्रालयातून महापालिकेस देण्यात आल्या. त्यानुसार जोशी बुधवारी सकाळी अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याच्या तयारीत असतानाच सामान्य प्रशासन विभागानेही वस्तू व सेवाकर आयुक्त आशिष शर्मा यांना बेस्ट महाव्यवस्थापकाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिल्याची बाब समोर आली. त्यामुळे अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारायचा यावरुन दोन्ही अधिकाऱ्यांमध्येच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमासाठी फडणवीस आणि शिंदे यांच्यात संघर्ष सुरू होता. मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यासाठी दोन्ही विभागांनी धाव घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी अतिरिक्त कार्यभार सनदी अधिकाऱ्याला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांची ऑर्डर काढली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने अश्विनी जोशी यांची एकाच दिवशी ऑर्डर काढली. त्यामुळे नेमका अधिकार कोणाचा असा प्रश्न उपस्थित झाला होता.