जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं!; ‘जेव्हा मेंदू काम करायचं थांबतो, तेव्हा ठोकण्याची भाषा होते’
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना इशारा दिला.यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.देवेंद्र फडणवीस यांचा एक हितचिंतक आपल्याला अनेकदा भेटला. त्याने फडणवीस आणि आपल्यामध्ये फोनवरुन चर्चा घडवून आणली. अजित पवार यांच्याविरोधात आरोप करणे शक्य नसेल तर उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्याविरोधातील शपथपत्रावर स्वाक्षरी करण्याचा आग्रह माझ्याकडे धरण्यात आला. मात्र, आपण त्याला नकार दिल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नादी लागलात तर मी सोडत नाही, असा इशारा दिला होता.
जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे. जेव्हा मेंदू काम करायचं थांबतो, तेव्हा ठोकण्याची भाषा होते आणि माणूस गुद्दागुद्दीवर येतो अशी टीका जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता केली आहे. तसेच, महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यात टोकाची कटकारस्थान होतील, असे म्हणत जयंत पाटील यांनी सरकारच्या योजनावर देखील टीका केली आहे. लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडकी बायको योजना आणा, अशी मिश्किल टिपणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे क्लिप्स आहेत, मी त्या पब्लिक करेल, असा इशारा अनिल देशमुख यांना दिला होता. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे क्लिप्स आहेत, असा इशारा दिल्यानंतर अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना थेट चॅलेंज दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे काही क्लिप्स असल्याचा दावा केला. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी ते क्लिपिंग जनतेसमोर आणावे. मला माहित आहे त्यांच्याकडे कुठलीही क्लिप्स नाही. त्यामुळे मी दावा करतो की त्यांनी त्या क्लिपिंग समोर आणाव्यात. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते योग्य वेळ आल्यावर मी समोर आणेल, असे अनिल देशमुखांनी पेन ड्राईव्ह दाखवत म्हटले.