
लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुका १२ जुलैला होणार आहे. मात्र विधानपरिषद निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून तयारी केली जात आहे. त्या अनुषंगाने या निवडणुकीसाठी महायुतीने महत्वाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे.यावरून आता २०२२ च्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत वापरले तसंच पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरण्याच्या तयारीत महायुती असल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा पॅटर्न ठरवला जाणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले असल्याचं देखील समोर येते. महायुतीतील तिन्ही पक्षांकडील पहिल्या पसंतीची मते कशी द्यायची, दुसऱ्या पसंतीची मते कशी द्यायची, याबाबत रणनीती ठरविण्यात आली आहे. अपक्ष आमदारांसोबतच कॉंग्रेसचे ३ ते ४ तर ठाकरे गटाचे काही आमदार आपल्या गळाला लावण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याची देखील चर्चा आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या तीन जागांवर विजय कसा मिळविता येईल यावर चर्चा करण्यात आली. शिवाय आपल्याकडे पुरेस संख्याबळ असल्याचा दावाही यानिमित्ताने मविआकडून करण्यात आला आहे.
राज्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने नऊ उमेदवार उभे केले असून विरोधी महाविकास आघाडीचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. पाच उमेदवारांसह भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला आहे. शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात आहेत .भाजपकडून पंकजा मुंडे, परणिय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत. शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी, कृपाल तुमाणे. राष्ट्रवादी (अजित पवार) राजेश विटेकर,शिवाजीराव गर्जे. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव. शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिलिंद नार्वेकर हे 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.