
अशोक चव्हाण यांच्यासोबत काय घडले, हे मी पाहिले नाही. परंतु, हे मराठ्यांविरोधातील षड्यंत्र आहे आणि हे देवेंद्र फडणवीसांनी रचले आहे. तुम्ही गोरगरिबांच्या मुलांवर केसेस दाखल करत आहात.मराठा आरक्षणाविषयी घोषणा देणे पाप आहे का, हा सूड उगवण्याचा प्रकार आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपा नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून आता देवेंद्र फडणवीस सूडाचे राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा खेळ भरत आला आहे. थोडी माहिती मिळू द्या. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन सगळे जाहीरपणे सांगतो. जे जाहीर करणार आहे, ते अतिशय धक्कादायक असेल. सगळ्यांना त्यातून धक्काच बसेल, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला.

जो काही धक्कादायक खुलासा करणार आहे, त्याची एक झलक तुम्हाला सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी चाल रचली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हेदेखील सामील आहेत. कारण तो माणूस एकनाथ शिंदे यांचा आहे. कारण यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. गोरगरीब मराठ्यांवर फक्त अन्याय करायचा आहे. या सगळ्या गोष्टी गृहमंत्री त्यांचा पदाचा वापर करून करणार आहेत. तुमच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, तर त्यांच्यावरही ३५३ लावणार का, अशी विचारणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.

आता आम्ही मराठे जशास तसे उत्तर देणार आहोत आणि जे घडेल, त्याला जबाबदार गृहमंत्री असतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. या निवडणुकीसाठी मराठा समाजाने एकही उमेदवार दिलेला नाही आणि माझा कुणालाही पाठिंबा नाही, हे जाहीरपणे सांगतो. कुणीही खोटेपणाने हे सांगू नये. वापरू नये. तुमच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा फायदा करून घेऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

