राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार होती. पण आता दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले.ते बुधवारी मंचर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अमोल कोल्हे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
मुंबईत मराठा आरक्षण संदर्भात बोलाविलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित नसल्याने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले होते की, सरकारने जनतेत संभ्रम पसरवू नये. महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट असून यातून सक्षम तोडगा काय तो समोर आणावा, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी दिली असून मागेच मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री यांचा व्हिडीओ समोर आला होता. आपण काय बोलायचे आणि निघून जायचे यामध्ये त्यांची काय भूमिका आहे हे समजणे गरजचे असून सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे असल्याचे अमोल कोल्हे यांनी म्हटले.
विरोधकांना राज्यात अशांतता राहावी, असे वाटत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. राज्यात सरकार महायुतीचे आहे, त्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनीच आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले.मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव मंगळवारी विधिमंडळात मांडण्यात आला. याविषयी बोलताना अमोल कोल्हे यांनी म्हटले की, भाजप सरकारमध्ये नावे बदलणे हेच धोरण दिसतंय. नावं बदलून शहरात पाणी साचायचं थांबत नाही, विमानतळाचे छत कोसळणे थांबत नाही, रेल्वेचे अपघात थांबत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यापेक्षा नागरिकांना सुविधा मिळणे महत्वाचे आहे, असे कोल्हे यांनी म्हटले.