Latest Marathi News
Ganesh J GIF

आर्थिक प्रगती होत नसल्याने देवऋषीचा केला खून ! मृतदेह नदीपात्रात टाकून अपघात भासविण्याचा प्रयत्न, असा आला गुन्हा उघडकीस

गुंजवणी नदीच्या पुलाच्या सुरक्षा कठड्यालगत मोटारसायकल अडकवली होती. त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला होता. अपघात झाल्याचे वाटेल असे प्रथमदर्शनी कोणालाही वाटेल, असे दृश्य होते. परंतु, हा खूनाचा प्रकार असल्याचे डोक्याला झालेल्या जखमेवरुन पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी शोध घेऊन आरोपीला पकडले. करणी केल्याच्या संशयावरुन देवऋर्षीचा खून केल्याचे उघड झाले. गणपत गेनबा खुटवड (वय ५२) असे खून झालेल्याचे नाव आहे. गणपत खुटवड काळुबाई देवीचा देवऋषी आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्निल ज्ञानोबा खुटवड (वय ३०) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत खुटवड याचा मृतदेह गुंजवणी नदीचे पुलाजवळ नदीपात्रात २३ सप्टेबर रोजी मिळाला होता. पुलावर त्यांची मोटारसायकल मिळाली होती. खुटवड यांच्या डोक्याला जखम होती. त्यामुळे हा खूनाचा प्रकार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती. आदल्या दिवशी गणपत खुटवड यांच्या दिनक्रमाची माहिती घेतली असता त्यांचे गावातील स्वप्निल खुटवड याच्याबरोबर वाद विवाद असल्याचे व तो गणपत खुटवड पाठोपाठ नसरापूरला गेल्याची माहिती मिळाली.स्वप्निल खुटवड याला खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. पण तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत व राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली.तेव्हा त्याने माहिती दिली. गणपत खुटवड यांचे रेशनिंग दुकान आहे. तसेच तो काळुबाई देवीचा देवऋषी असून तो करणी करतो़ व त्याने आपल्यावर करणी केली आहे. त्यामुळे आपल्याला रेशनिंग मिळणे बंद झाले. त्याची आर्थिक प्रगती होत नाही, असा गैरसमज स्वप्निल खुटवड याचा झाला होता. त्या रागातून त्याने गणपत खुटवड यांचा पाठलाग करुन रात्री गुंजवणी नदीचे पुलाजवळ अडवून मारहाण केली. डोक्यावर दगडाने मारुन त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह नदीपात्रात टाकून दिला. त्यांची मोटार सायकल पुलावर सुरक्षा कठड्या लगत अडकवून ठेवली. जेणे करुन अपघात झाल्याचे वाटेल, अशी माहिती स्वप्निल खुटवड याने दिली.

पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन स्वप्निल खुटवड याला अटक केली.ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी, सहायक पोलीस निरीखक दत्ताजी मोहिते, कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलीस अंमलदार अमोल शेडगे, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, राजु मोमीण, अतुल डेरे, बाळासाहेब खडके, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, अंमलदार जगदीश शिरसाठ, नाना मदने, अक्षय नलावडे यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!