
अपमान आणि दिवाळीचा पगार कापल्याने ड्रायव्हरने लावली आग
हिंजवडी आगीच्या घटनेबाबत धक्कादायक माहिती, म्हणाला मला एवढा कांड करायचा नव्हता पण...
पुणे -हिंजवडीमध्ये बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली होती. कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागल्याने चार जणांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाले होते. पण आता त्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंजवडी मधील ती घटना अपघात नसल्याचे समोर आले आहे. ही आग अपघाताने नव्हे, तर चालकाकडून हेतुपरस्सर लावण्यात आली. या घटनेत स्वत: चालकाने ज्वलनशील केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला.फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी माहिती समोर आली आहे. चालकाचा दिवाळीत पगार कापला होता तसेच गाडीतील सह कर्मचारी यांनी त्याला त्रास दिला होता. त्यामुळेच चालकानं, सूडबुद्धीने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासातून उघडकीस आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. तिघांशी वाद होता त्यांना मारायचं म्हणून त्याने हा प्रकार केला. पण या घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत शंकर शिंदे, गुरुदास लोखरे, सुभाष भोसले आणि राजन चव्हाण यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे चालकाला भासवायचे होते. परंतु शॉर्ट सर्किटने लागलेली आग अगदी काही मिनिटांत भडका घेत नाही. हाच संशय पोलिसांना आल्याने त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने काही सांगितले नाही. नंतर मात्र मनातील राग त्याने बोलून दाखवला. मी चालक असूनही मला मजुराची वागणूक देण्यात येत होती. माझा दिवाळीचा बोनसही कापण्यात आला होता. दुपारी जेवायला जातानाही मला काम सांगत होते. परवा दुपारी मला जेवणाचा डबा खायलाही वेळ दिला नाही. तसेच बसमधील तीन जणांशी माझे वाद होते. त्यामुळे मी हा प्रकार केला, अशी कबुली जनार्दन हबर्डीकर याने पोलिसांजवळ दिली आहे. जनार्दन हंबर्डीकर याने बेंजामिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करून, काडीपेटीच्या सहाय्याने बसला आग लावून स्वतःचे जीव वाचवण्यासाठी बसच्या बाहेर उडी मारली होती, असे प्राथमिक तपासून उघडकीस आले आहे.
चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि चार जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.