
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीत तणाव निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वादावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंसोबत तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र या भेटीनंतरही शिवतारे यांची भूमिका कायम असून त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर घणाघाती हल्ला चढवला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, “युतीधर्म पाळायला हवा, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. मात्र मी मुख्यमंत्र्यांना गणितं समजावून सांगितलं आहे. मी जरी लढलो नाही तरी अजित पवार निवडून येणार नाहीत, हे मी त्यांना सांगितलं. बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध सामान्य जनता असा लढा आहे. मी ४-५ दिवस लोकांशी चर्चा करून निर्णय घेतो, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाही. मात्र त्याचबरोबर जनतेचा शब्दही तितकाच महत्त्वाचा आहे. सध्या माझीही तब्येत बरी नाही. त्यामुळे मी दोन दिवस इथं उपचार घेऊन त्यानंतर पुण्याला जाणार आहे. तिथं गेल्यावर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेणार आहे,” अशी भूमिका शिवतारे यांनी घेतली आहे.
“बारामतीत पवारांना हरवण्याची ऐतिहासिक संधी निर्माण झाली आहे. अजित पवारांनी सगळ्यांनाच हैराण केलं आहे, सगळ्यांनाच संपवण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार आता पुण्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी फक्त राजकीय उद्देशातून पुरंदरमधील एका साध्या कार्यकर्त्याला २५ कोटी रुपयांचा निधी दिला. त्याच्याकडे कोणतंही पद नाही. मात्र फक्त आता निवडणूक आहे म्हणून हा निधी देण्यात आला. पक्ष वाढवण्यासाठी ते सरकारचे पैसे वापरत आहेत. याची प्रचिती भाजपसह सर्व पक्षांना पुढील काळात येईल. महायुतीनं अजित पवारांना बारामतीची जागा सोडली तरी त्यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही,” असं म्हणत आपण अजित पवारांविषयी मवाळ भूमिका घेणार नसल्याचं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, “तुझा आवाका किती, तो बोलतो किती, तू कसा निवडून येतो, हेच बघतो, अशी धमकी मला अजित पवारांनी दिली होती. माझा आवाका किती हे त्यांना कळू द्या. ते एवढे घाबरत का आहेत?” असा खोचक सवालही विजय शिवतारे यांनी विचारला आहे.