सोलापुरात खळबळ..! ऐन निवडणुकीच्या तोंडावर माकपच्या माजी आमदाराच्या घरावर दगडफेक ;संशयितांना अटक, नेमकं प्रकरण काय?
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सूरु असून प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. प्रत्येक उमेदवार मतदारसंघात प्रचार रॅली काढत आहे, गाव बैठका पार पडत आहे. असे असताना आता विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. काँग्रेसकडून ही दगडफेक झाल्याचा आरोप होत आहे.
याबात अधिक माहिती अशी की, सोलापूर शहर मध्यचे माकपचे उमेदवार नरसय्या आडम मास्तर यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेस आडम मास्तर हे घरात नव्हते, त्यावेळेस ही दगडफेकी करण्यात आली आहे. ही दगडफेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आता आडम मास्तर यांनी केला आहे. आडम मास्तर हे सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर काही युवकांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली होती. या घटनेनंतर आडम यांच्या पत्नी कामिनी आडम यांनी अँड. अनिल वासम यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर वासम यांनी ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांनी काही पोलिसांना घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यावेळेस घटनास्थळी काही युवकांचा गोंधळ सूरू होता. वासम आणि अन्य काही जणांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी आता काही तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असी माहिती आडम यांनी दिली आहे.दगडफेक करीत गोंधळ घालणारे कार्यकर्ते हे विरोधक असावेत. दारू पिऊन गोंधळ घालणे, विटांनी मारणे असे प्रकार सूरू होते. त्यांना रोखत असताना अॅड. अनिल वासम यांनाही धक्काबुक्की झाली. भविष्यात माझ्यावरही प्राणघातक हल्ला होऊ शकतो. याचा विचार करून ताब्यातील युवकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मी पोलिस आयुक्तांना विनंती करतो, असे नरसय्या आडम यांनी म्हटलं आहे.