Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात पेट्रोल व डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हडपसर पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल २ कोटी २८ लाखाच्या मालासह पाच जणांना अटक

पुणे दि १०(प्रतिनिधी)- हडपसर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या पेट्रोल व डिझेलची चोरी कऱणाऱ्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्याकडून एकूण २४ हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अलीकडील काळातील ही मोठी कारवाई आहे.

सुनिलकुमार प्राणनाथ यादव, दाजीराम लक्ष्मण काळेल, सचिन रामदास तांबे, शास्त्री कवलु सरोज, सुनिल रामदास तांबे अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिस आठ एप्रिलला हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलिस अंमलदार मनोज सुरवसे यांना अवैध इंधन विक्रीची माहिती मिळाली होती. वाशी नवी मुंबई येथुन एटीफ पेट्रोल (विमानासाठी वापरण्यात येणारे पेट्रोल) डिझेल भरुन टँकर शिर्डी एअरपोर्टकडे जाणार होते. संबंधित टँकर कंपनीकडून प्रवासाचा मार्ग वेळ नियोजीत आणि टँकरला अ‍ॅटोलॉक असतानाही आरोपींकडून इंधनाची चोरी वारंवार होत होती. त्यामुळे पोलिस पथकाने हडपसर परिसरात छापा टाकला असता, आरोपी टँकरमधून इंधनाची चोरी करताना मिळून आले आहे. संबंधित ठिकाणाहून दोन इंधन भरलेले टँकर, आठ मोकळे टँकर, १४ कॅन असा २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एचपीसीएल कंपनीचे अधिकार्‍यांसह पोलिस अधिकारी मिळून पंचनामा केल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले आहे. याचा पुढील तपास सामाजीक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा करत आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रंजनकुमार शर्मा एसीपी बजरंग देसाई, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्‍वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे आणि पथकाने केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!