उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी शिरूर,आंबेगाव तालुक्यांत विविध विकासकामांची उद्घाटने केली. या वेळी झालेल्या सभांमध्ये विविध मुद्द्यांवर आणि नेत्यांवर त्यांनी टीका केली. मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी घोडगंगा साखर कारखान्याच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘अविवाहित मुलाला कारखान्याचा अध्यक्ष करू नको, असे मी तुमच्या आमदारांना (अशोक पवार) सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी माझे ऐकले नाही. आपला खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. माझ्या सांगण्यावरून तुम्ही त्यांना मते दिलीत, मात्र आमदारांनी कारखान्यात लक्ष न दिल्याने पुढे कारखाना बंद पडायची अवस्था निर्माण झाली. तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. त्यासाठी फक्त तुम्ही मला साथ द्या. विद्यमान संचालक मंडळाला घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल; तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू. लवकरच तुमचा कारखाना संकटातून बाहेर येऊ शकतो. आम्ही सोडून घोडगंगा कारखाना कुणीही सुरू करून दाखवावा. मंत्रिमंडळात सर्व खाती आमच्याकडे असल्याने तो फक्त आम्हीच चालू करू शकतो.
’’‘खासदार कोल्हे, आमची चूक’
‘‘मी खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी मते मागितली. नंतर ते दोन वर्षांनी त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाल्याने ते राजीनामा देतो, म्हटले होते. खरंच राजकारण हा त्यांचा पिंडच नाही. सेलिब्रिटींना तिकीट देतो, यात आमच्याही चुका आहेत. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढे आणतो. त्यांना मतदारांचे काही पडलेले नसते. आताही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. त्यातून ते वातावरण निर्मिती करताहेत. परंतु हे तात्पुरती आहे,’’ अशा शब्दांत पवार यांनी खासदार कोल्हेंवर निशाणा साधला.
कोल्हेंचे अजित पवार यांना प्रत्युत्तर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना कोल्हे म्हणाले, ‘‘मला उमेदवारी देण्यासाठी दादा आपण मला १० वेळा निरोप पाठवून भेटीसाठी का आग्रही होता? मला पहिल्याच टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे.तो पुरस्कार आपले प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना देखील मिळालेला नाही. तर यापूर्वीही अनेक अभिनेते खासदार होऊन गेलेत त्यांना देखील संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाही,’’ या आशयाचा व्हिडिओ ट्वीट करत अजित पवार यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. तर मंचर येथील विविध उद्घघाटनाची पत्रिका मला मिळाली, मात्र त्यात वेळ दिलेली नाही यामुळे घड्याळ बंद पडले आहे का? आणि कार्यक्रमात तुतारी वाजवून स्वागत करा असा चिमटा देखील काढला आहे.