
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हाॅटेल चालकावर जीवघेणा हल्ला
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, हाॅटेलची तोडफोड करत दहशतीचे वातावरण, हाॅटरलमध्ये तरुणांची भाईगिरी
ठाणे दि २४(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. कारण जेवणाची ऑर्डर देण्यासाठी उशीर झाल्याच्या रागातून तीन जणांनी हॉटेल मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना ठाण्यातील आझाद नगर येथे घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ओंकार भोसले, अभि पाटील आणि राजू शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल चालक संतोष शेट्टी यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ओंकारवर याआधीही अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आझाद नगर, ब्रम्हांड परिसरातील सागर गोल्डन हील टॉप या हॉटेलमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास ओंकार भोसले आणि त्याचे मित्र आले होते. सुरुवातीला त्यांनी इथे दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या शुद्धतेबाबत त्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यावर हॉटेल मालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण ते वेटरलाही शिविगाळ करु लागले. त्यावेळी हॉटेल चालक संतोष शेट्टी यांनी तिघांनाही हॉटेलच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर ते सर्वजण बाहेर निघुन गेले. पण ओंकारने चायनीज दुकानातून चाकू आणला आणि हाॅटेल मालकावर हल्ला केला. तर त्याच्या इतर साथीदारांनी हाॅटेलमध्ये तोडफोड केली. या घटनेनंतर हल्लेखोर मोटार सायकलने तिथून पसार झाले. पण हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत हाॅटेल मालकाने कासारवडवली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु केला आहे. यासोबतच पोलीस घटनेचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत असून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ओंकार भोसले याच्याविरुद्ध हाणामारीसह गंभीर स्वरुपाचे २४ गुन्हे दाखल आहेत. हे टोळके ऑर्डरचे बिल देणार नसल्याची कल्पना हॉटेल मालकाला आली होती. त्यामुळेच त्यांनी त्यांना जेवणाची ऑर्डर देण्यास उशीर केला. त्यानंतर या तिघांनी तोडफोड केली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिंदेच्या ठाण्यात ही गोष्ट घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.