विरोधात बातमी लागू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या
भाजपाचे प्रदेशाध्यक्षांचे वादग्रस्त वक्तव्य, वक्तव्याची आॅडिओ क्लिप व्हायरल, विरोधकांची जोरदार टिका
अहमदनगर दि २५(प्रतिनिधी)- भाजपाने लोकशाहीसाठी महाराष्ट्रात मिशन ४५ चे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे वेगळाच वाद रंगला आहे. तसेच राज्यातील विरोधकांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
बावनकुळे यांच्या उपस्थितीत अहमदनगरमधील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकाऱी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बुथ रचना व पदाधिकाऱ्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले. पण यावेळी त्यांनी अजब विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीत त्यांनी पत्रकारांसाठी दिलेल्या सूचनांबाबतची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे. बावनकुळे म्हणाले, महाविजय २०२४ पर्यंत बूथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, हे बघा. ज्या बूथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत, हे पाहा. त्यांची यादी बनवा, यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंटवाले आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहासाठी बोलवायला, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे, समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे आहेतच, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
बावनकुळे यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टिका केली आहे. विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हे विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणं हे त्यांचं काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. अशी टिका सुळेंनी केली आहे.