
आपलं अफेअर विसरून जा, नाहीतर तुला मारून टाकेन
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांचा महिलेला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार, लग्नाची मागणी करताच धमकी, पण दराडे म्हणतात...
अहिल्यानगर – कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे हे वादात अडकले आहेत. त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यामुळे पोलीस दारात खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणी ही मूळची पश्चिम बंगालमधील असून, सध्या ती मुंबईमध्ये राहते. दराडे व तिची मुंबई येथे ओळख झाली. दराडे यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. ऑगस्ट २०२३ ते २२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान पालघरच्या मानोर इथल्या फार्महाउस आणि जोगेश्वरी वेस्ट मुंबई याठिकाणी तिच्याबरोबर वारंवार संबंध ठेवण्यात आले. पण तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, आपल्यात असलेले अफेअर विसरून जा, असे म्हणून दराडे यांनी तिला शिवीगाळ केली. यानंतर तरुणीने दराडे यांना तुझ्यावर केस करेल, असा इशारा दिला. मात्र दराडे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी देत तुझ्यावरच केस करेल अशी धमकी दिली. आरोपीने तिला जीवे मारण्याची आणि उलट तिच्यावर केस करण्याची धमकी दिली असल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक लोखंडे करत आहेत. या घटनेमुळे जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, आपल्या विरोधात दाखल फिर्याद खोटी असून, संबंधित महिलेने आपल्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितले असल्याचे दराडे यांचे म्हणणे आहे. महिला जुहू (मुंबई) येथे मेहुण्याच्या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट आणि पुढे व्यवस्थापक म्हणून काम करत होती. तिने आपल्याशी ओळख वाढवून घरगुती अडचणींचा बहाणा करत माझ्याकडून वेळोवेळी पैसे उकळले आहेत. माझ्याविरुद्ध अत्याचाराची फिर्याद दाखल करण्याआधी ही महिला चार दिवस नगरमध्ये तळ ठोकून होती. असा दावा करत दराडे यांनी संबंधित महिलेविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिलेला आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाणे हे सर्वांत संवेदशनील भागातील आणि महत्वाचे पोलिस ठाणे आहे. पण अलीकडे ते वादात अडकले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या पोलिस ठाण्यात नियुक्त झालेले अधिकारी काही ना काही वादात अडकले आहेत. त्यातही महिलांवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. यापूर्वी याच पोलिस ठाण्यातील विकास वाघ यांचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते. आता दराडे यांच्याबाबतही महिलेचे प्रकरण समोर आल्याने हे पोलिस ठाणे चर्चेत आले आहे.