
माजी मंत्र्याच्या पत्नीने केली आपल्याच महायुती सरकारची पोलखोल
हनी ट्रॅप प्रकरणाला वेगळे वळण, पिडितेला समोर आणत केला मोठा गाैप्यस्फोट, हे आमदार, खासदार अडकणार?
बीड – राज्यात नाशिकमधील हनीट्रॅप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ठाण्यातील एका महिलेने प्रसारमाध्यमांसमोर येत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्यात आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी संबंधित महिलेला समोर आणत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा मुंडे यांनी या महिलेला समोर आणत हा कसलाही हनीट्रॅप नसून सदर महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने पत्रकार परिषदेत ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचेफोटो दाखवत गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने जिम परिसरात माझ्याशी ओळख केली. मी तुम्हाला ओळखतो, असे सांगून त्याने माझा मोबाईलनंबर घेतला. एके दिवशी मला चहा पिण्याचे निमंत्रण देत घरी बोलवण्यात आले, विशेष म्हणजे आपली पत्नी देखील भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. त्यामुळे मी घरी चहा पिण्यासाठी गेले. पण तिथं गेल्यावर त्याने मला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि त्याने आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका पोलिसाने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. मला शुद्ध आल्यानंतर मी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, पण तिथं माझी तक्रार घेतली नाही. त्यानंतर मी डीसीपी, सीपी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून माझ्यासोबत झालेला प्रकार सांगितला, पण कोणीही दखल घेत नाही, असे पिडिता म्हणाली आहे. या महिलेनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी तिच्यासह मुलीवरही गुन्हा दाखल केला. या महिलेच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नसल्याचंही करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे. हनी ट्रॅपमध्ये अनेक आमदार, खासदार आणि अधिकारी अडकले आहेत. हे प्रकरण मनासारखं चालत नसलं की ते महिलांना बदनाम करत ‘हनी ट्रॅप’ ठरवत आहेत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हनी ट्रॅप प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली असून विरोधकांनी महायुती सरकारची मूळ उभारणीच अशा ब्लॅकमेलिंगवर आधारलेली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी अधिक तीव्र होत आहे.