छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रिल्सच्या नादात कार दरीत कोसळून युवती मयत झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही रिल्सच्या नादात एकाचा जीव गेला आहे. जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्या दुचाकीवर रिल्स बनवली.यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कठड्याला धडकून अपघात झाला. यात मागे बसलेला एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्यावेळी बीड बायपासवर घडली. हे दोन्ही मित्र जालना येथील रहिवाशी आहेत.
अनिरूद्ध कळकुंबे (वय २५) असे मयताचे नाव आहे. तर मधु शेळके (वय ३० दोघेही रा. गणेशपुर, जालना) हा जखमी आहे. दोघेही शुक्रवारी सकाळीच दुचाकीवरून (एमएच २१ एम ११५४) बीडमार्गे तुळजापूरला जात होते. मधु हा दुचाकी चालवत होता तर अनिरूद्ध मागे बसलेला होता. बीड बायपासवर आल्यावर दुचाकीवर असतानाच अनिरूद्ध याने आपल्या मोबाईल रिल्स बनवण्यासाठी व्हिडीओ तयार करू लागला. यावेळी दुचाकी चालक असलेल्या मधुचे लक्ष विचलीत झाले असून बाजूच्या कठड्यावर जावून दुचाकी आदळली. यामध्ये डाेक्याला व छातीला मार लागल्याने अनिरूद्धचा जागीच मृत्यू झाला तर कठडा व दुरपर्यंत फरपटत गेल्याने मधुच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून तो सोशल मिडयावरही व्हायरल झाला आहे. या दोघांनाही जिल्हा रूग्णालयात दाखल केले हाेते. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. याप्रकरणाची शनिवारी दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या सुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात रिल्स बनविताना कार दारीत कोसळून झालेल्या अपघातात श्वेता दिपक सुरवसे (२३, रा.हनुमाननगर,छत्रपती संभाजीनगर) या युवतीला प्राण गमवावा लागला होता. ही थरारक घटना १७ जून रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली होती. श्वेता ही ही मित्र शिवराज संजय मुळे (२५, रा.हनुमान नगर) याच्यासोबत कारमधून ( क्रमांक एम.एच.२१,बी.एच.०९५८) सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात गेली होती. येथे श्वेताने कार चालवत असतानाच रिल्स बनविण्यास शिवराज यास सांगितले. मात्र, रिव्हर्स गिअर पडून एक्सलेटवर दाब पडल्याने कार वेगाने मागे जात थेट डोंगरावरुन खाली दरीत कोसळली. या भीषण अपघातात श्वेताचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच बीडमध्ये रिल्सच्या नादात एका तरूणाचा जीव गेला आहे.