बारामती दि १९(प्रतिनिधी)- बारामती शहरातील श्रीरामनगर येथील कवी मोरोपंत शाळेच्या समोर भरदिवसा अल्पवयीन मुलांनी एकाची हत्या केली होती. त्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून प्रेमप्रकरणातुन ही हत्या करण्यात आली आहे. शशिकांत बाबासो कारंडे यांच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विधी संघर्षग्रस्त एकाचा शशिकांत यांचा मुलगा शेखरशी वाद झाला होता. त्यावेळी त्याने फिर्यादींच्या मुलावर हल्ला केला होता. त्यावेळेस देखील पोलिसांनी कारवाई केली होती.विशेष म्हणजे तीनही अल्पवयीन मुलं एकमेकांचे दोस्त आहेत. यातील मृताचा मुलगा आणि तिन्ही आरोपी एकाच शाळेत शिकलेली आणि पूर्वी एकमेकांचे दोस्त होते. परंतु मुलींच्या मैत्रीवरून त्यांच्यात वाद झाला. यातील मृताचा मुलगा यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे ते आपल्या मैत्रिणीच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण करतो असा त्यांचा गैरसमज झाला. मृतक शशिकांत यांनी वडीलकीच्या नात्याने त्यांना भांडण न करण्याबाबत एक-दोन वेळा समजवले होते. याचाही राग त्यांना होता. त्यातूनच धारदार शस्त्राने वार करत ही हत्या करण्यात आली.
मृत शशिकांत काल त्यांच्या मुलीला घेण्यासाठी शाळेमध्ये आलेले होते. त्यावेळी श्रीराम नगर भागात त्यांचा वचक व्हावा, असे कृत्य करावे व भविष्यात त्या ठिकाणी दबदबा निर्माण करावा अशा विचारातून ही हत्या करण्यात आली आहे पोलीसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पण या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.