हडपसरमध्ये ७० ते ८० जणांच्या टोळक्याची चाैघांना मारहाण
फटाके फोडण्यावरुन रंगला वाद, परिसरातील झाडांचेही नुकसान, दगडफेकीमुळे तणावाचे वातावरण, काय राडा झाला
पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्यात नेमके काय सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल पुण्यात गुन्हेगारीला ऊत आला आहे.कोयता गँग, गोळीबार अश्या घटना पुण्यात सर्रास घडत आहेत. त्यातच पुण्यात आणखी एक धक्कादाय घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर भागात दोन गटात तुफान राडा झाला आहे. ७० ते ८० जणांनी मिळून चार-पाच जणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.
हडपसर पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख शेख वाढदिवसानिमित्त त्याचे मित्र फटाके फोडत होते. यावेळी बाळासाहेब आवटी यांनी फटाके घराच्या बाहेर फोडू नका अशी विनंती केली. पण याचा राग आल्याने जवळपास ७० ते ८० जणांच्या जमावाने बाळासाहेब आवटी यांच्यासह त्यांची पत्नी, अभिषेक सोनवणे, सनी आवटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. दरम्यान हडपस पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान अशा घटना रोखण्यासाठी पोलीसांनी नुकतीच हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार स्वप्नील ऊर्फ विट्या संजय कुचेकर याच्यासह टोळीतील ७ साथीदारांविरुद्ध मोक्काची कारवाई केली होती.
या वादात दगडफेकही झाली असून परिसरातील झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. हडपसरमध्ये अलीकडच्या काळात अनेक गुन्हेगारी घटना समोर आल्या आहेत. हडपसर पोलीस स्टेशन समोर उभ्या असलेल्या एका गाडीतच मृतदेह सापडला होता.