करुन दाखवले! पैलवान सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी
झोळी डाव टाकत गतविजेता शिवराज राक्षेला केले चितपट, काही सेकंदात जिंकला डाव, पराभवाचा वचपा काढला
पुणे दि १०(प्रतिनिधी)- तमाम महाराष्ट्राचे आणि कुस्ती शाैकिणांचे लक्ष लागून असलेल्या यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. गेल्यावेळी झालेल्या पराभवाची सिकंदरने सव्याज परतफेड केली आहे.
पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेतील अखेरची लढत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली. यामध्ये सिंकदर शेखने मैदान मारले अवघ्या, २३ सेकंदात ही लढत सिकंदरने जिंकली. सिकंदर शेखला गेल्या वर्षी या स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पराभव स्विकारावा लागला होता,मात्र त्यानंतर पंचाच्या निर्णय विरुद्ध अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पण यावेळी सिंकदरने पूर्ण तयारीने विजयश्री खेचून आणली. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला. “गतवर्षीचा खरा विजेता मीच होतो असं सांगत यावर्षी मी गेली सहा सात महिने पुर्ण तयारी करून महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला याचं खरं श्रेय माझे वडील आणि कोच यांना जातं असे सांगतले. मागील वर्षी वाद खोटा उठवला होता आणि मागच्या वर्षीची सुद्धा खरा विजेता मीच होतो सांगत माझं पुढच ध्येय हे खूप मोठं आहे.” अशी प्रतिक्रिया सिकंदर शेखने दिली आहे. सिकंदर शेख कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे. लहान वयातच अनेक मातब्बर पैलवानांना चित केल्यामुळे सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ गाव. त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात. सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले. पण त्यांचे स्वप्न सिकंदरने अखेर पूर्ण केले आहे.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेत फूट पडल्यानं दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतल्या जात आहेत. ही स्पर्धा रामदास तडस यांच्या गटाने आयोजित केली होती. पारितोषिक वितरणप्रसंगी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे सदस्य प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, योगेश दोडके यावेळी उपस्थित होते.