
पुण्यात गँगवार! वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या मुलाची हत्या
गणेश विसर्जन पूर्वसंध्येला गोळीबाराने पुणे हादरले, हत्येचा बदला हत्येने, 'हे' गाणे लावत केली हत्या
पुणे – ऐन गणेशोत्सवात पुण्यात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कुमकरचा मुलगा गोविंद कुमकर याचा शुक्रवारी संध्याकाळी नाना पेठ येथे गोळ्या घालून खून करण्यात आला.
गोविंदचा वडील गणेश कोमकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. त्यामुळे, या घटनेचा संबंध जुन्या वैमनस्यातून झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला होता. यात वनराज यांची बहीण संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि प्रकाश कोमकर यांच्यासोबत जागेवरून वाद सुरू होता. याच रागातून सोमनाथ गायकवाड याला हाताशी धरून संजीवनी, जयंत, गणेश आणि प्रकाश कोमकर यांनी वनराज यांच्या हत्येचा कट रचला होता. यानंतर पुण्यातील हे खून सत्र पुढेही सुरूच राहिल असे भाकित वर्तवले जात होते. रिप्लाय म्हणून आंदेकर टोळीकडून कोणाचा तरी गेम केला जाईल असे सांगितले जात होते. वर्षानंतर आंदेकर टोळीने खूनाचा बदला म्हणून पहिली गेम ही कोमकर कुटूंबियातील गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद याचा गोळ्या झाडून खून केला. कोमकर कुटूंबिय नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्पलेक्स या इमारतीत राहण्यास आहे. शुक्रवारी आठच्या सुमारास गोविंद हा त्याच्या एका मित्रासोबत इमारतीच्या खाली थांबलेला होता. तेव्हा दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी थेट गोविंदवर गोळ्या झाडत त्याचा खून केला. त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. दरम्यान, भर वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडला गेल्याने मोठा गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली. धक्कादायक म्हणजे टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया, दो ये मटका हे गाणे डीजेवर लावत नाना पेठेत गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये झालेल्या या गँगवॉरच्या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक केली जाईल, अशी शक्यता आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.