पुण्यात युट्यूबवर व्हिडिओ पाहत मुलीने केली स्वतःची प्रसूती
जन्मानंतर नवजात अर्भकासोबत संतापजनक कृत्य, महिला आयोगाने घेतली दखल
पुणे दि १७(प्रतिनिधी) – विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवे-धावडेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवे- धावडेत बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मामागील सत्य अखेर समोर आले आहे. युट्यूबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःच स्वतःची प्रसूती केली. त्यानंतर नवजात बाळाला फेकून दिल्याची कबुली संबंधिताने दिली. राज्य महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
चार ते पाच महिन्यांपूर्वी संबंधित अल्पवयीन मुलगी आणि तिची आई घराजवळ असलेल्या एका खाजगी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असण्याची शक्यता असून आपण तातडीने याबाबत सोनोग्राफी करुन खातरजमा करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांनी डॉक्टरांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. गर्भपिशविला सूज आल्याने मुलीच्या पोटात दुखत आहे, असे शेजाऱ्यांना आणि घराच्या मालकिणीला सांगितले. पण सोसायटीच्या आवारात नवजात बाळ आढळून आल्याने खळबळ उडाली. उपचारासाठी पोलीस या बाळाला रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी केलेल्या चाैकशीनंतर सत्य समोर आले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार, हे बाळ तिनेच दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकलं होतं. तिने युट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती केल्याचीही माहिती दिली. या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कोंडवे धावडे परिसरामध्ये अल्पवयीन सतरा वर्षीय मुलीने एका मुलाला घरातच जन्म दिल्यानंतर त्याला दुसऱ्या मजल्यावरून टाकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याची राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी1/3 pic.twitter.com/IpjuI9duwT
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 16, 2022
राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. “ही अत्यंत धक्कादायक घटना असून राज्य महिला आयोगाने या प्रकरणी स्वाधिकाराने दखल घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. सध्या बाळ आणि कुमारी माता उपचार घेत असून, राज्य महिला आयोग यावर जातीने लक्ष देत आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.