ओयो रुमवर मुली आरती करायला तर जात नाहीत ना?
महिला आयोगाच्या अध्यक्षांचं अजब वक्तव्य, मार्गदर्शन करताना मुलींची कान उघाडणी
दिल्ली दि २०(प्रतिनिधी)- हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. मुली ओयो रूममध्ये हनुमानाची आरती करायला तर जात नाही ना, असा थेट सवाल करत त्यांनी मुलींची कान उघाडणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने सामाजिक वर्तृळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आरकेएसडी महाविद्यालयात सायबर क्राईम आणि जनजागृती कार्यक्रमा दरम्यान, महिलांच्या छेडछाडीबाबत जनजागृती व्हावी, या विषयावर त्यांना कार्यक्रमात बोलायचे होते. यासाठी त्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी भाटिया म्हणाल्या की, “मुलगा किंवा मुलगी कॉलेजमध्ये येताच ते स्वत:ला स्वतंत्र समजू लागतात. त्यांना असे वाटते की आपल्याला काय मिळेल अन् काय नाही. मुलींना वाटते की, त्या हवे ते कपडे परिधान करून हवं तिथं जाऊ शकतात. शिवाय मुलंही विचार करू लागतात की कॉलेजमध्ये येताच आपल्या गर्लफेंडला फिरण्याची वेळ आली आहे. मुली ओयो रुममध्ये हनुमानाची आरती करायला जात नाहीत ना, तिथं आपल्या सोबत कुठलाही वाईट प्रंसग घडू शकतो, हे न समजालया मुली इतक्या दुधखुळ्या कशा काय असतात,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप सारख्या कायद्यामुळे आमचे हात बांधले गेलेत. लिव्ह-इन रिलेशनशिप सारखा कायद्याचा पुनर्विचार करणे, त्यात बदल करणे, आवश्यक आहे, असे ही मत भाटीयांनी व्यक्त केले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यांमुळे आमचेही हात बांधले गेलेत. अशा कायद्यामुळेच गुन्ह्यांमध्ये घट होत नाही कुटुंबव्यवस्था नष्ट होत आहे, असेही भाटीया म्हणाल्या आहेत.
भाटिया यांनी एका घटनेचा उल्लेख करताना सागितले की एका घटनेत पीडितेने निवेदनात म्हटले आहे की, आरोपीने तिला पेयात काहीतरी मिसळून प्यायला लावले आणि नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. मुलींना माहित नाही का, अशा ठिकाणी काहीही चुकीचे होऊ शकते.’ त्यामुळे प्रत्येक पावलावर काळजी घेण्याचे आवाहन भाटिया यांनी केले आहे. पण त्यांच्या ओयो वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.