यवतमाळ शहरात मंत्र्याच्या घरासमोर जमिनीत स्फोट
थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद, स्थानिक नागरिकांमध्ये भीती
यवतमाळ दि ४(प्रतिनिधी)- यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३०२ कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या अमृत योजनेची पुरती वाट लागली आहे. कारण ज्वालामुखी फुटल्यानंतर ज्या पद्धतीने लाव्हा बाहेर येताे अगदी तशाच पद्धतीने रस्ता दुभंगल्याने पाणी बाहेर आल्याचे दृष्य कॅमे-यात कैद झाले आहे.
यवतमाळ शहरातील यवतमाळ विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील माईंदे चौक ते हिंदी हायस्कूल रस्त्यावरील जलवाहिनी अचानक फुटली. ही जलवाहिनी फुटल्यानंतर रस्त्याचा एक भाग सुमारे दाेन फुट हवेत उडाला. जलवाहिनी फुटताच पाण्याचा फवारा रस्त्याच्या दोन्ही बाजुला गेला. जलवाहिनी फुटल्याने लाखाे लिटर पाणी वाया गेले आहे. त्यावेळी जलवाहीनी फुटली त्यावेळी तेथून जाणारा एक दुचकीस्वार जखमी झाला आहे.पाईपलाईन फुटल्याने रास्ता एक फूट पेक्षा जास्त उखडला गेला आहे. लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या घराजवळ ही पाईपलाईन फुटली आहे. जलवाहिनी फुटल्याचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या घटनेनंतर यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेत वापरण्यात आलेली जलवाहिनी ही निकृष्ट दर्जाची असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.घटना घडताना एकाएकी मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.