मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड
तोडफोड प्रकरणी मंगेश साबळेंना अटक, सदावर्तेंची जरांगे पाटील यांच्या अटकेची मागणी, उपोषणाचा दिला इशारा
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्याचबरोबर मराठा समाजही आता आक्रमक झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे आंदोलन आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
मराठा आरक्षणाविरोधात कायदेशीर आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात सदावर्ते यांच्या गाडीची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून यात बीड मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तिघांवर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. मंगेश साबळे यांनीच मध्यंतरी मराठा आरक्षणाचे समर्थन करत स्वतःची गाडी पेटवून दिली होती. तसेच साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. दोन दिवसांपूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घराबाहेर उपोषण देखील केले होते. गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. तेव्हापासूनच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत मराठा समाजामध्ये रोष आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करणारी जी घटना घडली आहे. त्याचे समर्थन करत नसल्याचे जाहीर केले आहे.
फक्त मनोज जरांगे यांचं ऐकून घेऊ नका, असं माझं राज्य शासनाला म्हणणं आहे. आमचं देखील तुम्ही ऐकायला हवं. आता मनोज जरांगे यांचे लाड थांबले नाही तर मी देखील उपोषण करणार आहे. असा इशारा सदावर्ते यांनी दिला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना अटक करा अशी मागणी देखील सदावर्ते यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात सदावर्ते विरूद्ध मराठा समाज वाद होण्याची शक्यता आहे.