
सोलापूर दि २२(प्रतिनिधी)- माढा तालुक्यातील भुताष्टे गावात कामाचे पैसे देण्यासाठी बोलावून दोन मजुरांना ठेकेदाराने हातपाय बांधून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी कारवाई करत चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे मारहाण पैशाच्या वादातून करण्यात आली की आणखी काय कारण होते याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बालाजी मोरे हा भुताष्टे इलेक्ट्रिक पोलचा मुकादम आहे. विकास भिवा नाईकवडे हे बालाजी मोरे याच्याकडे मजूर म्हणून काम करतात. १५ ऑगस्टला विकास हे आपल्या पत्नीला बालाजी मोरे यांच्याकडे जाऊन माझ्या कामाचे पैसे घेऊन येतो, असे सांगून गेले होते. मात्र रात्र झाली तरी ते घरी परतले नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संदीप लवटेने सोनाली नाईकवडे यांना त्यांच्या पतीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ दाखवला,यात विकास नाईकवडे आणि सेवक कसबे या दोघांना बालाजी मोरे, भालचंद्र यादव व इतर दोन जण मारहाण करत असल्याचे दिसत होते. त्यानंतर सोनाली यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या व्हिडिओवरून माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींविरोधात अॅट्रॉसिटी, मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामाचे पैसे मागितल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यदिनीच ही मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत सध्या चारही आरोपींना पोलीसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.