मुंबई दि १९(प्रतिनिधी)- मुंबईच्या वर्सोवा बंदराजवळील अरुंद रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या डंपरच्या धडकेत एका हातगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा सगळा थरार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डंपरने हातगाडी चालकाला जोरदार ठोकर मारल्याने झालेल्या अपघातात हातगाडी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. वर्सोवा पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला सीसीटीव्ही फुटेच्या आधारे अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी मासळीची हातगाडीवरून वाहतूक करणारा हातगाडी चालक वर्सोवा बंदराकडे निघाला होता. यावेळी पाठीमागून सुसाट वेगात आलेल्या डंपरने हातगाडीला जोरात धडक दिली. रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारतीची भिंत आणि हातगाडी यांच्यामध्ये हातगाडीचालक दाबला गेला, या दुर्देवी अपघातात हातगाडी चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. संपूर्ण घटनेचा थरार त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी आरोपी डंपर चालक अमीनदीन दरेसाहेब दर्गा यास अटक केली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.