
गुणरत्न सदावर्ते आणि शिंदेंच्या सेनेमध्ये जोरदार हाणामारी
एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा, शिवीगाळ आणि हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, कारण काय?
मुंबई – मुंबईतील एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुणरत्न सदावर्ते यांचा गट आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. बँकेच्या सत्ताधारी संचालकांवर विरोधी संचालकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एसटी बँक आधी आनंदराव अडसूळ यांच्या ताब्यात होती. नंतर सदावर्ते निवडणुकीत उतरले. त्यात त्यांचे उमेदवार विजयी झाले. निवडून आल्यानंतर सदावर्तेंवर इतर सदस्यांनी संशय व्यक्त केला होता. मागील दोन वर्षात दोन्ही गटांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडलेले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आधी वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर थेट हाणामारी झाली असल्याचं बोललं जात आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या हाणामारीनंतर शिवसेनेचे कार्यकर्ते नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या घटनेबाबत आनंदराव अडसुळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, गुणवर्ते यांच्यावर विश्वास ठेवून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. मात्र, हा संप काही यशस्वी झाला नाही. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. या बँकेच्या संचालक पदावर सदावर्तेंच्या पॅनलचे सदस्य निवडून आल्यावर त्यांनी काही गैरव्यवहार सुरू केले. आमचे संचालक हा सर्व प्रकार उघडकीस आणतील. त्यामुळे त्यांनी बाहेरची माणसं आणत मोठ्या प्रमाणात मारहाण केली आहे. कोणाच्या परवानगीने हे बैठकीत शिरले? असा सवालही आनंदराव अडसुळ यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, एसटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एकेकाळी एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर उभारलेली, आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून प्रसिद्ध होती. सध्या बँकेच्या व्यवस्थापनावर अनेक गंभीर आरोप होत असून, सतत वादग्रस्त घटनांनी तिची प्रतिमा डागाळली आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेले संचालक बैठकीत आल्याचा जाब विचारल्यामुळे मारहाण झाल्याचा आरोप सदावर्ते गटानं केला आहे. आता संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडे असून, खरे दोषी कोण हे पुढील तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र, कामगारांच्या पैशावर चालणाऱ्या या संस्थेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.