
भरधाव हायवा डंपरने विद्यार्थ्यांच्या दुचाकीला चिरडले
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, एकाचा मृत्यू, मुजोर चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न पण....
बारामती – बारामती तालुक्यातील तांदुळवाडी हद्दीत हायवा डंपरने महाविद्यालयीन युवकाच्या दुचाकीला चिरडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
जुनेद राजू झारी असे या मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेत त्याचा मित्र तुषार भिसे हा जखमी झाला आहे. जुनेद झारी व तुषार भिसे हे दोघेही बारावीत बारामतीतील तुळजाराम चतुचंद महाविद्यालयात शिकत होते.कॉलेजमधील पेपर संपल्यानंतर जुनेद झारी व त्याचा मित्र तुषार सोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. दुचाकीवरून दोघे निघाले असताना वळण रस्त्यावर अचानक पुढून आलेल्या डंपर चालकाने आपली गाडी वळवली. यामुळे घाबरलेल्या दुचाकी वरील दोघेही जमिनीवर कोसळले. यावेळी डंपरचे पुढील चाक जुनेद झारी याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला मित्र थोडक्यात बचावला. त्यानंतर अपघात झाल्यानंतर दुचाईवर मागे बसलेला तुषार हा डंपर चालकाकडे गेला. यावेळी चालक खाली उतरल्यानंतर त्याने कोणतीही चौकशी न करता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असून तुषार हा त्याचा पाठलाग करण्यासाठी धावत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामधील दृश्य थरकाप उडवणारी आहेत.
या अपघातानंतर डंपर चालक कुंडलिक गोरख बनसोडे यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. तालुका पोलिसांनी या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.या अपघातप्रकरणी ग्रामस्थ व नातेवाईक संतप्त झाले आहेत. हा अपघात नसून जाणीवपूर्वक युवकाचा जीव घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.