अंगावर काटा आणणारा बाळासाहेबांच्या शिवसेना भवनाचा इतिहास
शिंदे गटाच्या प्रति शिवसेना भवनावर शिवसैनिक काय म्हणाले
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्याचे विद्यमान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केले. तेंव्हापासून ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा सामना पहायला मिळत आहे. पण आता शिंदे गटाकडून नवीन शिवसेना भवन बांधण्याची घोषणा केल्यापासून नव्या वादाला तोंड फुटले आहे.शिवसेना भवन हे सा-या शिवसैनिकांसाठी शक्तिपीठ आहे. एक वेगळा आदर या शिवसेना भवनाचा आहे. पण मुळ शिवसेना भवनाच्या उभारणीचा इतिहास रंजक आहे. तो काय होता हे पाहूया.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी १९ जून १९६६ या दिवशी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना स्थापन केल्यानंतर संघटनेसाठी कार्यालय हवे हे लक्षात आल्यानंतर मूंबईतल्या पर्ल सेंटरच्या दोन खोल्यांमध्ये शिवसेनेचं कार्यालय सुरु करण्यात आलं. पण बाळासाहेबांच्या झंझावातामुळे शिवसेना पक्ष झपाट्याने वाढत होता.त्यामुळे नवे कार्यालय गरजेचे होते. त्यामुळे शिवसेना भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दादरमध्ये शिवाजी पार्कजवळ उमर या मुस्लीम व्यक्तीकडून जागा घेत शिवसेना भवन उभारण्यात आले. गोरे आर्किटेक्टच्या संकल्पनेतून गड – किल्ल्यांच्या धर्तीवर सेनाभवनाची उभारणी करण्यात आली आहे. याचे उद्घाटन १९ जून १९७७ रोजी करण्यात आले.
बाळासाहेबांच्या प्रभावामुळे शिवसेना भवन कायम दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिलेले आहे. १९९३ सालच्या मुंबई साखळी बाॅम्बस्फोटावेळी शिवसेना भवनालादेखील लक्ष्य करण्यात आले होते. २६/११ च्या हल्ल्यावेळी देखील दहशतवाद्यांनी सेनाभवनाची रेकी केली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर देखील त्यांचे पार्थिव शिवसेना भवनात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे शिवसैनिकांसाठी या भवनाचे महत्व खुपच खास आहे.
शिवसेनेना कोणत्याही निवडणूकीसाठी उमेदवारांची घोषणा या भवनातील भवानी मातेच्या चरणी अर्पण करूनच जाहीर करण्यात येत असते.
पण आता शिंदे यांनी प्रति शिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली आहे. तेही दादरमध्येच उभारण्यात येणार असल्यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुळ शिवसेना भवनाची बरोबर नवीन शिवसेना भवन कधीच करु शकणार नाही अशा भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या आहेत.