
हाॅटेल भाग्यश्रीचा मालकाचा मोठा निर्णय, आता हाॅटेल बंद…
सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती, ग्राहक आणि जागेमुळे घेतला मोठा निर्णय, बघा नेमकं काय झालयं?
तुळजापूर – हाॅटेल भाग्यश्री आता सगळ्यांच्या परिचयाचे झाले आहे. भन्नाट रिल्स आणि २५० रुपयात मिळणारे अनलिमिटेड ढाव्हरा मटन चांगलेच लोकप्रिय झाले आहे. त्याचबरोबर तोडफोड आणि अधूनमधून हाॅटेलचे बंद असणे यामुळे देखील हे हाॅटेल नेहमीच चांगलेच चर्चेत असते.
हॉटेल मालक नागेश मडके यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता हाॅटेल भाग्यश्रीचे स्थलांतर केले जाणार आहे. हाॅटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ जुलै ते ८ जुलैपर्यंत हॉटेल बंद असणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पंढरीकडे निघालेले वारकरी धाराशिवमार्गे जातात, त्यामुळे बोकड कापणे योग्य वाटत नाही, पण बुधवार, दि. ९ जुलै रोजी नवीन जागेमध्ये हॉटेल सुरु होईल. आपण देवाधर्माचं पालन केलं पाहिजे असेही मडके म्हणाले आहेत. हाॅटेल भाग्यश्रीची सध्याची जागा ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे अपुरी पडत आहे. पार्किंग समस्या आणि सुविधाही अपुरी पडत असल्यामुळे महिलांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे नवीन आणि प्रशस्त जागेमध्ये हॉटेल स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याठिकाणी सर्व सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे जुन्या हाॅटेलच्या जागेत बोकड कापण्याचे काम चालू राहणार आहे. दरम्यान हाॅटेल भाग्यश्रीवर सध्या टोकन पद्धत आहे. पण काही ग्राहक टोकन पद्धतीचा चुकीचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे टोकन पद्धत बंद करत आता बिलिंग सिस्टीमचा वापर केला जाणार आहे.
नागेश मडके हे फारसे शिक्षित नसतानाही मेहनत आणि सोशल मीडियाच्या योग्य आणि प्रभावी वापराने त्यांनी आपले नाव महाराष्ट्रभर पोहोचवले आहे. त्यांना आता तुळजापूर विधानसभेचे वेध लागले आहेत. दरम्यान हाॅटेल भाग्यश्री, तिरंगा, अंबादास यामध्ये मोठी स्पर्धा दिसून आली आहे.