Latest Marathi News
Ganesh J GIF

इव्हेंट सेलिब्रिटी, करमणुकीचे पैसे किती घेतात? विजय वडेट्टीवारांचा राज ठाकरे यांना सवाल

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मतदान पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आतापर्यंत दोन सभा घेतल्या आहेत.यानंतर आता ते येत्या 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दादरमधील शिवाजी पार्क येथील मैदानावर एकाच मंचावर येणार आहेत. अशातच आता विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे हे इव्हेंट सेलिब्रिटी आहेत. एका इव्हेंटसाठी किती पैसे घेतात, याची माहिती काढली पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल विजय वडेट्टीवर यांनी केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मनसेप्रमुख राज ठाकरे हे इव्हेंट सेलिब्रिटी आहेत. सभेतील मुख्य वक्त्यांच्या भाषणापूर्वी लोकांचा टाईमपास आणि करमणुकीचे काम ते करतात. ते भाजपने दिलेल्या स्क्रिप्टनुसार आपली भूमिका पार पाडत आहेत. राज ठाकरे यांना वरून सांगण्यात आलं असेल की, ‘बेटा राज देख लो! ये फाईल देख लो’. भाजपाच्या फाईल्सचा धसका घेऊनच राज ठाकरे महायुतीच्या मंचावर प्रचारासाठी जात असतील. मुंबईतील सभेसाठी भाजपाने त्यांना मोठी बिदागी दिली असेल. राज ठाकरे एका इव्हेंटसाठी किती पैसे घेतात, याची माहिती काढली पाहिजे. राज ठाकरेंना पिक्चर आणि सिरीयल चालत नाही. त्यामुळे ते इतरांच्या व्यासपीठावर जाऊन काम करतात. आम्हीसुद्धा असे सेलिब्रिटी आणतो. त्यांचे विमानाचे तिकीट काढतो आणि त्यांना पैसे देतो. परंतु भूमिका बदलणाऱ्याला जनता कधीही साथ देत नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारला असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत आणि मला विश्वास आहे की, महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 जागा जिंकेल. त्यामुळे मोदी आणि भाजपा घाबरलेले दिसत आहेत. आज मुंबईत रोड शो होतो आहे आणि राज्यात 24 वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेला सुद्धा नेता एवढ्या सभा घेत नाही, तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. यामधून त्यांना राहुल गांधींविषयी असणारी भीती दिसत आहे, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.विजय वडेट्टीवार म्हणाले की, मोदींचा आज मुंबईत रोड शो आहे. दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली, त्यामध्ये 18 जणांचा बळी गेला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे बळी गेले. जी क्रेन घटनास्थळी लवकर जायचा हवी होती, ती काल पोहोचली. असे असतानाही दुर्घटना घडली तिथून थोड्या अंतरावरच मोदींची रॅली निघत आहे. तुम्ही त्यांच्या मृतदेहवरून रॅली काढताय का? असा सवाल करत भाजपाने मोदींचा रोड शो रद्द करायला पाहिजे होता. पण हा रोड शो करून भाजपाला आनंद मिळत असेल तर त्यांच्या संवेदना मेल्या आहेत, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!