
आंतरजातीय विवाह केल्याने पतीला बेदम मारहाण, पत्नीचे अपहरण
पुण्यात सैराटची पुनरावृत्ती, पतीचा पाय मोडला, विश्वनाथ आणि प्राजक्ताच्या नात्याला विरोध करत जीवघेणा हल्ला
पुणे – आंतरजातीय विवाह केल्याने पत्नीच्या नातेवाईकांनी पतीला पाय लिटरपर्यंत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पत्नीचे अपहरण करण्यात आले आहे.
विश्वनाथ बबन गोसावी असे मारहाण झालेल्या पती आणि तक्रारदाराचे नाव आहे.तर त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी असे मारहाण करून अपहरण झालेल्या पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वनाथ गोसावी व त्यांचा परिवार खरपुडी येथे आश्रम चालवतात. त्याचे आणि पत्नी प्राजक्ता यांच्यात प्रेम जुळले. त्यातून त्यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी रजिस्टर लग्न केले. मात्र आंतरजातीय विवाह केला म्हणुन मुलीच्या आई, भावाकडून त्याला विरोध होता. रविवारी दुपारी सव्वा वाजता मुलीच्या माहेरच्या लोकांनी घरी येऊन प्राजक्ताला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यात आडकाठी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पती विश्वनाथ गोसावी याला मुलीचे भाऊ व बरोबर आलेल्या इतरांनी मारहाण केली. दहशत निर्माण करून मुलीला घेऊन गेले. पायावर मारहाण करण्यात आल्याने विश्वनाथ याचा पाय मोडला. त्याला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून खरपुडी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मुलीचा भाऊ आणि आई सह १८ ते २० जणांवर अपहरण आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सुशीला राजाराम काशिद, अक्षय उर्फ गणेश राजाराम काशिद, बंटी काशिद व इतर १५ ते १६ अनोळखी युवकांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.