
पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
पत्नी आणि प्रियकर त्रास देत असल्याने घेतला टोकाचा निर्णय, दोघांवर गुन्हा दाखल
पुणे – पत्नीच्या अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पत्नी व तिच्या प्रियकराने मारण्याची धमकी दिली होती, तसेच वारंवार त्रास दिला जात होता. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील पुनावळे येथे घडली आहे.
संजित गोविंदराव शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ प्रताप गोविंदराव शिंदे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी संजित यांची पत्नी आणि तिचा प्रियकर रोहित थोरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रताप यांचा भाऊ संजित शिंदे याची पत्नी महिला आरोपी आणि आरोपी रोहित थोरात यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांचे प्रेमसंबध संजित शिंदे याला माहित झाले. त्यामुळे त्याने पत्नीला संबंध न ठेवण्याबद्दल समजावले. पण त्यामुळे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी संजित शिंदे व त्याच्या मुलांना मारण्याची धमकी देऊन त्रास देत देण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटळून संजित याने आत्महत्या केली.
संजित यांनी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.