पोलीस पत्नी आणि मुलीची हत्या करत पतीची आत्महत्या
तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला, शाळेत गेल्याने एक मुलगी वाचली, नेमके काय घडले?
बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने पोलीस असलेल्या आपल्या पत्नीसह दीड वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः ही आत्महत्या केली आहे. या हत्याकांडाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस दलात कार्यरत असलेल्या वर्षा किशोर कुटे, दीड वर्षांचा मुलगी कृष्णा किशोर कुटे पती किशोर कुटेनी धारधार शस्त्राने हत्या केली. यानंतर पती किशोर कुटेने स्वत: आत्महत्या केली. बुलढाण्याच्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये वर्षा कुटे या कार्यरत होत्या. त्यांना आठ वर्षाची आणि दीड वर्षांच्या दोन मुली आहेत. आठ वर्षांची मुलगी ही शाळेत गेल्याने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किशोर कुटे हे गावात शेती करत होते. दोघांचा विवाह १० वर्षापूर्वी झाला होता. आज वर्षा कुटे या दुपारीच्या सुमारास कर्तव्या बजावल्यानंतर घरी परतल्या. तेव्हा पती किशोर कुटेंनी पत्नींची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. यानंतर आपल्या दीड वर्षाची चिमुकलीची देखील हत्या केली. त्यानंतर गांगलगाव शिवारात जाऊन स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रूग्णालयात हलविले आहे. नागपंचमीच्या दिवशी झालेल्या या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेमक्या कोणत्या कारणाने हे कुटुंब संपवण्यात आले याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासानंतरच हत्या आणि आत्महत्येचे कारण स्पष्ट होईल.
आत्महत्या करण्यापूर्वी पतीने कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट देखील लिहलेली नाही. त्यामुळे हे हत्याकांड का घडलं याविषयी अद्यापही संभ्रम कायम आहे. सध्या पोलीस या हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण हृदयद्रावक घटनेमुळे पोलीस प्रशासनाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे.