पत्नीच्या प्रियकरला पतीकडून जीवे मारण्याची धमकी
प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल, पुण्यातील लोणी काळभोरमध्ये खळबळ
पुणे दि ५(प्रतिनिधी) – पुण्यात त्रिकोणी प्रेमसंबंधाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पत्नीचे एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पतीला समजली. पतीने पत्नीच्या प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्या प्रियकरानं राहत्या घरी आत्महत्या करुन जीवन संपवले आहे. या विचित्र प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
मंगेश सुरेश जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रेम सबंध ठेवणा-या विवाहितेवर आणि तिच्या पतीवर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मंगेश याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती त्या संबंधित महिलेच्या पतीला समजली. यानंतर महिलेच्या पतीने मंगेशला फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी मंगेशला सतत मानसिक त्रास दिला.त्यामुळे आरोपींच्या त्रासाला वैतागून मंगेशने मंतरवाडी येथील राहत्या घरात आत्महत्या केली.
मंगेशचे वडील सुरेश मारुती जाधव यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.