
‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटत होते’
भाजपच्या बड्या नेत्याच्या गाैप्यस्फोट, फडणवीसांनी सांगितल्यामुळे मंत्रिमंडळात सामील, शिंदे गटाला 'हा' इशारा
मुंबई – तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत भाजपासोबत जात महाविकास आघाडी सरकारला धक्का देत महायुतीचे सरकार स्थापन केले होते. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. पण आता याबाबत भाजपच्या प्रदेशाधषयक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे.
तीन वर्षापुर्वी महाविकास आघाडीला धक्का देत सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले होते. सर्वात मोठा पक्ष असल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं सर्वानाच वाटत होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सर्वांनाच धक्का बसला. अनेक भाजपा नेते नाराज झाले होते, यात रवींद्र चव्हाण यांचेही नाव होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांना एवढे वाईट वाटले, की ते तडक घरी निघून गेले होते. एका मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे, ते म्हणाले की, असा कोणता कार्यकर्ता असेल ज्याला वाटेल की, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. त्यावेळी मला असं वाटत होतं की, सत्ता बदल होईल तेव्हा १०० टक्के देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हेच वाटत होतं. पण जेव्हा राज्यपालांकडे गेलो त्यावेळी इतर कार्यकर्त्यांसारखा मलाही धक्का बसला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यावेळी मला वाईट वाटलं आणि हे सगळ्यांना माहिती आहे. दुःख वाटल्याने घरी निघून गेलो. पण त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत माझी चर्चा झाली आणि मी पुन्हा एकनाथ शिदेंसोबत बोलायला लागलो, असे चव्हाण म्हणाले आहेत. रवींद्र चव्हाणांनी यावेळी एक मोठा बॉम्ब टाकला. ते म्हणाले,अजित पवार ज्याप्रमाणे आमच्या विचारधारेबरोबर जोडले गेले.तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रहिताचा विचार करत कुणी आमच्यासोबत येत असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ असं त्यांनी सांगत खळबळ उडवून दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राजकीय संघर्ष असल्याच्या चर्चेवर चव्हाण यांनी भाष्य केले. शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिंदे यांनी फोन करून आपले अभिनंदन केले, असे चव्हाण यांनी सांगितले.