
संतोष देशमुख हत्येशी माझा संबंध नाही, मला निर्दोष सोडा
वाल्मिक कराडचा न्यायालयात अर्ज, पुरावे नसल्याने जामीन मिळणार? देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडच्या एका दाव्यामुळे संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाला महत्व प्राप्त झाले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येशी किंवा अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीशी माझा काहीही संबंध नाही. मी निर्दोष आहे, त्यामुळे मला सोडावे असे म्हणत वाल्मिक कराडने न्यायालयात निर्दोषत्वाचा अर्ज दाखल केला आहे. वाल्मिक कराडने एक अर्ज दाखल केला आहे. यात त्याने स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. “या खटल्यातून मला मुक्त करावे, कारण माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खून किंवा खंडणीप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”, असा अर्ज कराडने केल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले आहे. दुसरीकडे या प्रकरणातील काही आरोपींनी सीआयडीकडून काही कागदपत्रं मागितली आहेत. यामध्ये वाल्मिक कराडचंही नाव आहे. मात्र त्याने मागितलेली कागदपत्र सीलबंध आहेत. त्यामुळे सील उघडल्यानंतर न्यायालयासमोर ती कागदपत्रं दिली जातील असं उज्वल निकल यांनी सांगितलं. आतापर्यंत आरोपीच्या वकिलांनी जी कागदपत्र मागितली होती, ती सर्व देण्यात आली आहे. फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढच्या तारखेला आरोपीच्या वकिलांना दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आल्याचे अॅड. उज्ज्चल निकम यांनी म्हटले आहे. यावर २४ एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे.
बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच देशमुख यांचा गेल्या वर्षी ९ डिसेंबर रोजी अवदा कंपनीकडून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी कराडसह ८ जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.