‘मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देईन’
तानाजी सावंत यांनी दिली डेडलाईन,वादग्रस्त विधानावर मागितली माफी
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. पण या वक्तव्याबद्दल त्यांनी मराठा समाजाची जाहीररित्या माफी मागितली आहे. एवढेच नव्हे तर २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मराठा आंदोलनात सहभागी होईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे सावंत यांच्याविरोधातील रोष शमण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सावंत वादात अडकले होते. मराठा समाजाकडून त्यांच्यावर रोष व्यक्त करण्यात येत होता. अखेर त्यांनी माफी मागितली आहे ते म्हणाले की, “मी एक लाख वेळा मराठा समाजाची माफी मागायला तयार आहे. जर २०२४ पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर मी राजीनामा देईल आणि मोर्च्यात सहभागी होईल. हा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न चालूये. मी पाळण्यातल्या बाळापासून तर ९० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत माफी मागायला तयार आहे. माझा समाज आहे मला माफी मागायला काही वाटणार नाही”, असे सावंत यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी सावंत यांच्या वक्तव्यावर वाद झाल्यानंतर चंद्रकांत पाटील सावंतांच्या मदतीला धावून गेले होते. त्यांनी सावतांचे विधान मोडतोड करुन प्रसारित केल्याचा दावा केला होता. पण स्वतः सावंतानी माफी मागितल्याने वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली. असं विधान तानाजी सावंत यांनी केलं आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार वादात येण्याची शक्यता होती. पण आता आरक्षण २०२४ पर्यंत न मिळाल्यास राजीनामा देण्याचीही घोषणा सावंत यांनी केली आहे.