
हे बघ मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची क्लिप व्हायरल, शिंदे गटाच्या आमदारासह एकनाथ शिंदेनाही सुनावले, युतीत तणाव
जळगाव – मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर मंत्री रक्षा खडसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रक्षा खडसेंनी आरोपी पियूष मोरेला फोन करून याबाबत जाब विचारला आहे. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
रक्षा खडसे आणि आरोपी पीयूष मोरे यांची ही ऑडिओ क्लिप आहे. यात रक्षा खडसे या आरोपीवर चांगल्याच संतापलेल्या असल्याचे ऐकायला मिळत आहे. रक्षा खडसे यांची मुलगी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी, येथील काही टवाळखोरांनी या मुलींची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. आता रक्षा खडसे यांची क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये पियुष, तुमच्या जुन्या गावामध्ये त्या पोरांनी कृषिकाचा व्हिडिओ काढला अन् तुम्ही त्याला सपोर्ट करता. दोनवेळा तसं झालं ना, हे बघ मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय, अशा शब्दात व्हिडिओ काढणाऱ्या टवाळखोरांच्या मित्राशी खासदार रक्षा खडसे यांनी झापले आहे. ती माझी मुलगी होती, तिच्या सुरक्षेसाठीच मी त्या लोकांना (पोलिसांना) तिथं ठेवलंय. तुम्ही फक्त त्या आमदाराचे पाय चाटायला तिथ बसलेले आहेत. ते आमदाराचेच लोकं होते ना, असेही रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांचा रोख शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे होता. मी तुम्हा सगळ्यांना पोलिसात खेचणार आहे, तुम्ही आमदाराकडे जा किंवा शिंदे साहेबांकडे जावा. तुझा काय अधिकार आहे, त्या पोलिसाला बोलायचा. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हणत खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची ज्या मुलांनी छेड काढली ती मुले शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.
मुक्ताईनगरच्या यात्रेत काही मुलींसोबत मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी गेलेली असताना तिची छेड काढल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण सहा आरोपींवर पोक्सो अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.