पालक माझ्या विरोधात मतदान करणार असतील तर तुम्ही जेवण सोडा…आमदार बांगरांचा अजब सल्ला, व्हिडीओ व्हायरल
घरी जर दुसऱ्या कोणाला मतदान करणार असतील तर दोन दिवस जेवायचं नाही. आई-वडिलांना सांगायच की आमदार संतोष बांगरलाच मतदान करायचे, असा अजब सल्ला आ.संतोष बांगर यांनी लाख येथील शाळेत विद्यार्थ्यांना दिला. आ.संतोष बांगर हे आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आता तर त्यांनी शाळकरी मुलांकडून आ.संतोष बांगर यांनाच मतदान करायचे हे वदवून घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आ.बांगर हे औंढा तालुक्यातील लाख येथील शाळेत गेले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते मुलांना म्हणाले, तुमच्या घरी दुसऱ्याला मतदान होणार असेल तर दोन दिवस जेवायचे नाही, जर घरच्यांनी विचारले तर सांगायचे की, आमदार संतोष बांगर यांना मतदान केले तरच जेवण करणार आहे. त्यानंतर त्यांनी मुलांना प्रश्न विचारत मग सांगा आता कुणाला मतदान करायचे? असे विचारत आमदार संतोष बांगर हे नाव वदवून घेतले. अजून निवडणुका लांब असताना आ.बांगर यांनी शाळकरी मुलांसमोर सुरू केलेल्या या प्रचारामुळे हा विषय चर्चेचा बनला आहे. शिवाय लहान मुलांना असा अजब सल्ला दिल्याने हा टीकेचा विषय बनला आहे. विरोधकही यावरून टीका करीत आहेत.
यापूर्वीही अशा वक्तव्यांनी चर्चेत
काही दिवसांपूर्वीच त्यांनी नरेंद्र मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भरचौकात फाशी घेईल, असे वक्तव्य केले होते. त्यापूर्वी बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव झाल्यास मिशी काढण्याची भाषा केली होती. हे व्हिडीओही व्हायरल झाले होते.