
ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदे गटाला ‘एवढ्याच’ जागा मिळणार
शिंदेच्या दिल्लीवारीला ठाकरेंच्या युतीची किनार, शिंदे गटात धुसफूस, शिंदेच्या 'त्या' भुमिकेमुळे फटका बसणार, कारण काय?
मुंबई – महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावर तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. यावेळी त्यांच्यात राजकीय युती झाली नसली तरीही तसे संकेत मात्र त्यांनी दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र अस्वस्थता पसरली आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास शिंदेचे राजकिय वजन पूर्णतः संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचाच जास्त फायदा होताना दिसत आहे.
मीरा रोड येथे व्यापाऱ्याला मराठी न आल्यामुळे मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी अमराठी भाषिकांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केले होते. या आंदोलनात शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. पण आंदोलकांनी त्यांना तेथून जाण्यास भाग पाडल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता वाढली आहे. त्यात भर म्हणजे मराठीचा मुद्दा पेटल्यानंतर शिंदे गटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. त्यात एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिल्याने शिंदे गट बॅकफुटवर आला आहे. त्यामुळे जर महापालिका निवडणूकीत ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदे गटाचे अस्तित्वच पणाला लागणार आहे. मुंबईत ४० टक्के तर मिरा भाईंदरमध्ये २७ टक्के मराठी भाषिकांची संख्या आहे. मुंबईतील २२७ पैकी ११२ मतदारसंघात मराठी भाषिकांचा प्रभाव आहे. त्यामुळे ठाकरे बंधु एकत्र आल्यास ते सहज बहुमत मिळवू शकतात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता मराठी भाषेसंदर्भात शिंदे गट काय भूमिका घेणार? यावर महापालिकांच्या विजयाचं गणित ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीत याच विषयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण ठाकरे एकत्र आल्यास महाविकास आघाडीत फूट पडणार आहे. त्यामुळे युती आणि आघाडीचे चित्र स्पष्ट होईपर्यंत पक्का अंदाज बांधणे अवघड होणार आहे. पण सध्या मात्र शिंदे गटाच्या अडचणीत मराठीच्या मुद्द्यामुळे मोठी वाढ झाली आहे.
मुंबई २०१७ महापालिका निवडणूकीत एकत्र शिवसेनेला ८४ भाजपाला ८२, काँग्रेसला ३१, एकत्र राष्ट्रवादीला ९, मनसेला ७ एमआयएमला २, समाजवादी पक्षाला ६, अ. भा. सेनेला १ आणि अपक्षांनी ५ जागा जिंकल्या होत्या.